अभय – २

सध्या झी ५ वर अभय २ ही वेब सिरीज दाखल झाली आहे. अभय हा त्याचा पूर्वार्ध बऱ्यापैकी यशस्वी झाला त्यामुळे त्याचा दुसरा भाग करण्याचे धाडस टीमने केले. परंतु हा दुसरा भाग पहिल्यापेक्षा जास्त उत्कंठावर्धक आणि गुंतवून ठेवणारा आहे. याची मांडणी ही फारच साधी, सरळ आणि मुद्देसूद आहे. टेलिव्हिजन वर चालणाऱ्या सी.आय.डी. मालिकेसारखी फक्त गुन्ह्याच्याभवती गोष्ट फिरते, पण अभय २च प्रोडक्शन डिझाईन खूप चांगलं आहे. कलाकारांची कास्टींग उत्तम आहे. असं म्हणतात जेवढा व्हीलन ताकदवान तेवढाच हिरो जास्त उठून दिसतो आणि हाच फंडा अभय २ च्या बाबतीत दिग्दर्शकाने वापरला आहे. पहिल्या भागात चंकी पांडे, दुसऱ्या भागात बिदिता बाग तर तिसऱ्या भागात राम कपूर असे एकाहून एक सरस अभिनेते घेतल्यावर आपोआप कुणाल खेमु या सगळ्यांमध्ये उठून दिसतो. आता याच्या प्रत्येक गोष्टीविषयी बोलुयात,

कथा –
प्रत्येक भागात विविध पद्धतीने खून होतो आणि त्याचा एकदम एकनिष्ठ पद्धतीने तपास करायला अभय प्रताप सिंह करतो. त्याची एस.टी.एफ ही टीम पोलिसांची एक स्पेशल टीम म्हणून कार्यरत असते. प्रत्येक खुनाचे पुरावे हे अगदी सहज सापडतात, त्याचा मागोवा घेत तो खून्यापर्यंत पोहोचतो. हे सगळं तुम्हाला खूप प्रेडिक्टेबल वाटेल पण जर याच फॉरमॅटची एखादी मालिका २० वर्ष चालू शकते तर हाच प्रेक्षक कॅप्चर करण्याचा प्रयत्न अभय २ ही मालिका करते आणि बऱ्यापैकी यशस्वी होते.

अभिनय –
चंकी पांडे हा माणूस पाण्या सारखा आहे, कोणत्याही भूमिकेत समरस होऊन जातो. मग तो हाऊसफुल मधला आखरी पास्ता असो किंवा अभय २ मधला दुकानदार. त्यांनी खलनायक अनेक ठिकाणी साकारला आहे पण वेब सिरीज च तंत्र ओळखून त्यात स्वतःला सामावून घेणं स्तुत्य आहे. ही भूमिका बघून यापुढे बऱ्याच ठिकाणी त्यांचं हे रूप पाहायला मिळणार हे खरं आहे. खूप काही मोठे प्रोजेक्ट नावावर नसतानासुद्धा बिदीता बागचा अभिनयाचा स्तर खूप उंच आहे, शेवटी आपण तिला बाबूमोषाई बंदुकबाजमध्ये नवाझ सोबत पाहिलं होतं. खूप प्रामाणिकपणे काम करणारी अभिनेत्री आहे ती. एकता कपूरचा स्टार नायक राम कपूर, अनेक वर्ष मालिकेत काम करणारा हा अभिनेता विविध भूमिका फार अप्रतिम करू शकतो हे समजण्यामागे वेब सिरीज सारख्या माध्यमाचा हात आहे. द अनसुटेबल बॉय किंवा अभय २, राम कपूर भाव इमोट करण्यात फार हुशार आहे. राग, द्वेष, मत्सर हे भाव इतक्या सफाईने दाखवणारे फार कमी अभिनेते आहेत, त्यातला राम कपूर एक. आता सर्वात महत्त्वाचं पात्र, कुणाल खेमू. एकदम प्लेन फेस ठेवून कसं काम करावं, हे कुणालकडून शिकावं. हे मी का सांगतोय, तर इंवेस्टीगेशन करणारा पोलीस अधिकारी हा भावनाशून्य असतो आणि तसचं अगदी कठोर आणि कोणताही भाव अभय प्रताप सिंगच्या मनात येत नाही. मला असं नेहेमी वाटतं की कुणाल खेमु हा नेपोटिस्मचा शिकार झाला आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून त्याच्याकडे फार कमी लोकांनी पाहिलंय. अजून विविध भूमिका त्याने कराव्यात असं मात्र मला अजुन वाटतं.

दिग्दर्शन –
केन घोष, हे दिग्दर्शक फार क्लिअर आहेत स्वतःच्या प्रोसेसच्या बाबतीत. केस ही प्रत्येक माणसाला कळेल एवढीच किचकट बनवायची. प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेचा अंदाज केन गोष यांना आला आहे, त्यामुळे सिंपल आणि मुद्देसुद सिन डिझायनिंग केलं आहे. लोकेशन आणि अभिनय याच्या जोरावर अनेक फ्रेम सजवल्या आहेत, ते जास्त छान वाटतं. शूटिंग नाशिकमध्ये करण्यात आलं असून या सिरीजबाबतीत आमचा एक विशेष सॉफ्ट कॉर्नर आहे. आमचे अनेक मित्र त्यामध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसतात त्याचा विशेष आनंद आहे.

सार –
कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने सांगितलं तर जास्त लवकर कळते आणि तेच इथे सुध्दा केलं आहे. उगाचच जगावेगळ्या थियरी शोधून त्यातून विचित्र लॉजिक नसल्लेया पटकथा लिहून कथेचा विचका करण्यापेक्षा अभय २ ची मांडणी कधीही सरसच. परंतु केवळ ३ भाग आत्ता प्रदर्शित केले आणि बाकी कथा सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या हा फॉर्मल्या कुठेतरी घातक ठरू शकतो. आज दिवसाला एक अशा स्पीडने वेब सिरीज येत आहे, अशात एवढा वेळ घेणं किती योग्य आहे हे बघावं लागेल.
                                   – आदि